१८००चा हिशोब , जगण्याची धडपड, अनभिज्ञता आणि आपण !
पाचशे रुपयांच्या तीन नोटा आणि शंभर- दोनशेची प्रत्येकी एक नोट असे एकूण १ हजार ८०० रुपये एका घरकाम करणाऱ्या काकूंना तेथील तरुणांनी दिले याबाबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. १८०० चा हिशोब मागणाऱ्या या काकू बघितल्या आणि अगदी पहिली प्रतिक्रिया ही होती की, यात खरंच एवढं हसण्यासारखं काय आहे? एक बाई आपल्या मेहनतीचे पैसे मागत आहे जसे आपणही न कळल्यास मागत असतो, मागतो, फील करतो, करू शकतो आणि समजवणारे तिला समजवत आहेत. मात्र ते तरुण हा सर्व संवादाचा व्हिडीओ शूट करत आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून हसणारे लोक ही अनेक दिसले आणि दया आली की, आज खरंच इंटरनेट नसते तर काय झालं असतं ? आपण करमणूकच कशी केली असती ? मग ती दुसऱ्याची फजिती बघून का होईना! हो ना? असो.
मग तोही विषय जुना झाला आणि मग लोकं झोपेतून जागे झाल्यासारखं म्हणायला लागले की, अरे हे तर ट्रोलिंग आहे. हे थांबवले पाहिजे. इतपत ठीक आहे, पण त्यावर सुद्धा तुमच्या आमच्यासारखे सुजाण, सुखी किंवा विशेषाधिकार असणारे वगैरे असे, म्हणायला लागले की काहीही (भली मोठी, टेक्निकल ) नावं का देत आहात ?, ट्रोलिंग कुठेय ते ? कित्ती इनोसन्स आहे यात ? तर काही प्रतिक्रिया अशाही होत्या की, इतकं कळत नाही का ? हिशोब स्वतःला येत नाही तर दुसऱ्याकडून मोजून घ्यायचे ? १८०० रुपयेच तर होते ना?, ती मुलं तर इंनोसंटली त्यांना समजावत आहेत. वगैरे वगैरे प्रतिक्रिया येऊ लागल्या. कित्ती छान म्हणजे हिशोब आज ना उद्या तिला येईल किंवा तिथपर्यंत ती पोहोचेल, पण तोपर्यंत तिचे हे प्रयत्न सुद्धा आपल्याला किती विनोदी वाटतात ! हो ना? तेवढे आपल्यात पेशन्स कुठेयेत ? आणि कशाला हवते? अगदी मला म्हणू शकता कि नम्रता तू यावर हस किंवा नको हसू, हे विनोदीचं आहे. विनोद का कळत नाही तुला यातला? त्रास कसला व्हावा आणि कशाला ? अजून फॉरवर्ड करत राहू, मग भले ते चूक आहे असं किंवा 'जस्टीस फॉर काकू' असं म्हणून का असेना .
असाच एका पुण्याच्या वयस्कर बाईचा व्हिडीओ वायरल केला होता, "फास्टेस्ट कॅशिअर इन द वर्ल्ड" म्हणून आणि नंतर अगदी नेटकर्यानी त्यावर आपली प्रतिक्रिया म्हणून 'हिला नोकरीवरून काढून टाका' असेही म्हटले होते. जेव्हा कि ती व्यक्ती एक विधवा आहे जी मेडिकल लिव्ह वर होती, दोन हार्ट ऍटॅक्स, आणि एका पॅरालिसिस च्या ऍटॅक नंतर ती आपल्या कामावर रुजू झाली होती. तिला अजूनही सुट्टी मिळू शकली असती पण तिने कामावर येण्याचा निर्णय घेतला. हि तिची चूक होती ? तरीही लोकांनी शेअर करताना शेअर केला आणि स्वतःची करमणूक करून घेतली.
या डिजिटल एरा मध्ये आपल्याला स्क्रीशॉर्ट्स हि खरे वाटतात? अगदी बॉयज लौकररूम बद्दल हि असच काहीस झालं.. मग यात तर जी मुले मायनर एज कॅटेगरी मध्ये आहेत त्यांच्या बद्दल सर्व प्रौढ लोकांनी काय स्टॅन्ड घेतला हा गुन्हा नाही ? काय पसरवल हे सर्व मीडियाने कस वापरलं हे सगळं सगळं आपल्या डोळ्यासमोरचं आहे, मीडिया ने किती उतावीळपणे यावर आपलं मत मांडावं ? सिलेक्टिव्ह रिडींग कराव, कन्व्हिनीयन्ट प्रोपोगेंडा बनवावा आणि अगदी न्यायाचा निवाडा करावा? कुणी दिला हा हक्क त्यांना, आपणच ना. एका व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी लढायच आणि दुसऱ्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचं काहीच वाटू नये ?
आपल्याला एक नागरिक म्हणून आपले सांविधानिक हक्क माहित नाही आणि आपण दुसऱ्याचे हक्क जपतही नाही. यात कसले आले नागरिक हक्क? असेही काहींना नक्की वाटेल पण किंवा ज्यांनी प्रूफ म्हणून (?) व्हिडीओ बनवला त्यांना आणि आपल्याला एक बाई म्हणून आपले तरी हक्क माहित आहेत का? असले तर हे विनोदी वाटूच शकणार नाहीत. मुळात हा व्हिडीओ तुमच्या आमच्या सारख्यानीच व्हायरल केला. सगळेच जण दात काढून त्यावर हसले आहेत. पण एक सांगते हे सर्व 'डीफेमेशन' आहे आणि हा एक ओफेन्सिव्ह क्राईम आहे .
हो ! आज तुमच्या माझ्यासारख्या सुशिक्षित बाईला असं कुणीही वागवले जरी असते, तर आपण कलमं लावली असती. नाही, पण आपल्यावर कशी येणार परिस्थिती ? आणि काहीही परिस्थिती असली तरीही कुणीही कुणाची कुठल्याही पद्धतीने धिंड का काढावी ? हे कितपत योग्य आहे? फनी, व्हायरल व्हिडीओजची आवड म्हणून आपण अजून किती खालच्या थराला जाणार आहोत ? का ही एकमेव करमणूक सध्या आपल्याकडे आहे? तुम्हाला खूप मनापासून असं बोलावसं वाटेल की अरे .... अरे.... ती मुलं तिला समजावत आहेत गं ... बघ ना, नीट बघ ... आपण 'असं' समजावतो आजकाल? की समजवून सांगण्याची आपली शक्ती, समज संपलीय? कि आपण पुढच्या पिढीला हे दाखवतोय की, "असं समजावून सांगतात, आणि हो रेकॉर्ड करायला विसरू नका"! की 'समोरच्याला कळत नाहीये' हेच आपल्याला एन्जॉय करायचं असतं? त्या काकूंना माहित तरी होत का की, तिचे हे हिशोबाच बोलण, मागणं शूट होतंय? सांगितलं होत? का सांगायचं तर तुम्ही पैसे दिले आहेत म्हणून ?, की ती घरकाम करणारी बाई आहे मग तिच्याकडून कसली कन्सेंट मागायची? (नम्रता प्लिज हा )
९ वर्षांपूर्वीची 'मी', आज 'ती' नाहीये. मीही शिकले बऱ्याच गोष्टी अजूनही शिकतेय... आपण सगळेच शिकतो ना? आणि हे छातीठोक काय सांगायचं ? या प्रवासात तुमच्याच जवळच्यांची फरफट होते. माहित नाही काकूंजवळ कदाचित कोण आणि किती जवळचे असतील ? त्या तरुणांना त्या काकूंचा नवरा, मुलं काहीकाही माहित नव्हतं किंवा असेल पण "त्यांना १८०० रुपयांचा हिशोब येत नाही, हे जर शूट केलं तर इतरांना फनी 'वाटूच' शकेल"! हा आणि ह्यावर एकमताने ठाम आत्मविश्वास होता, आपण तो सार्थ केला. आपण नाही सर्रास आपल्या आईला, बायकोला (प्रेमाने) म्हणतोच की, तुला काय अक्कल आहे?, तुला काय कळतं? हीच ही वृत्ती आहे का? असावी का? असू शकेल का?
करोडो रुपये, ३० हजार करोड, ५ हजार करोड आणि अजून काही करोड ज्यात किती शून्य असू शकतील, हा अंदाज ही येणार नाही अशा रकमांचा घोळ देशात (आजही) होत असताना किती जण नागरिक म्हणून त्याचा हिशोब मागतात ? माहित असला आणि माहित नसला तरीही ? किती जणांच्या नोकऱ्या गेल्यात, उपजीविकेचा प्रश्न आपल्या सर्वांपुढे आहे पण हे सगळ दिसत नाही आपण यावर बोलत नाही.. आपण आपल्या या परिस्थतीचा जाब हि विचारत नाही, हिशोब मागत नाही! कशाला मागतील ? आम्ही आम्ही खुश आहोत, असे व्हिडीओज बघण्यात. वायरल करण्यात. डीफेम करण्यात !
- नम्रता चांदवडकर भागवत
काउन्सेलिंग सायकॉलॉजिस्ट
Comments
Post a Comment