मनाचे झालेले तुकडे!

 World Schizophrenia day 24th May 2021.


वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे च्या निमित्तानं.

स्किझोफ्रेनिया म्हणजेच  छिन्नमनस्कता...मनाचे झालेले तुकडे! 

"मॅडम माझ्या मुलाला जेवण बिलकुल आवडत नाही, सारखा येता जाता मी जेवणात काही टाकत आहे का असं बघत राहतो, विचारतो." 

"माझी बहिण ३ महिने झाले कामावर जात नाहीय सारखी म्हणते की माझ्या कामावर लोकं जळत आहेत, माझे इमेल्स वाचतात आणि त्याचा दुरुपयोग करत आहेत."

"माझी बायको खूप तापट आहे, संशयी आहे. तिला मी कुणाशीही बोलले आवडत नाही, एक सारखी मला विचारत असते की माझ्याविषयी बोलत आहात का?"


"लोक माझ्या वाईटावर आहेत, मी चांगले काम केलं तरीही लोक माझ्याबद्दल वाईट च बोलत आहेत, मी ऑफिस मध्ये गेलो की लोक माझ्याकडे बघून कुजबुजत असतात."

असं काही कानावर पडलं तर तुम्ही काय करता? 
हे सारं कदाचित ऐकायला 'नॉर्मल' वाटत असलं तरीही असेलच असं नाही. 

कधीतरी येणारा संशय हा काही स्वरूपात आपण सर्व जण अनुभवतो पण 'एक सारखा' येणारा संशय आणि त्यानुसार जर तसं 'वर्तन' केलं जात असेल तर वेळीच मदत घेणं अत्यंत गरजेचं आहे.

या मानसिक आजारची 'लक्षणे' म्हणजे एक सारखा येणारा संशय, मनातले भ्रम आणि विभ्रम हे बरोबरच आहेत असा विश्वास, वास्तविकते चा आधार नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे, याचादेखील समावेश होतो.

अशा व्यक्तीला आपल्यावर कुणी प्रेम करीत नसल्याची, आपली छळवणूक होत असल्याची, किंवा आपल्या विरोधात कुणी कटकारस्थान रचत असल्याची भावना असते. 

संभ्रम आणि संशय असणे हे  स्किझोफ्रेनिआचे वैशिष्ट्य आहे आणि हळू हळू व्यक्ती आपल्या संशयाला धरून वर्तन करू लागते.

काहीतरी अस्तित्वात नसलेले संवेदनात्मक अनुभव येणे म्हणजे संभ्रमितपणा होय. संभ्रमित अवस्था अनेक प्रकारची असू शकते उदा. नसलेला आवाज ऐकायला येणे, गेलेली व्यक्ती बोलत आहे असे वाटणे, किंवा माझा कुणीतरी व्हिडिओ बनवला आहे, किंवा माझा गळा कुणीतरी दाबत आहे असं वाटणे इ.

एक तर या आजाराचे निदान त्याच वेळी होईल आणि ती व्यक्ती मदातला येईलच असं होत नाही कारण ही जबाबदारी त्या व्यक्तीच्या 'जवळच्या नातेवाईकांची' असते. 

वरील कुठलीही गोष्ट आपण रोजच अनुभवत आहोत, किंवा बघत आहोत असं असेल तर वेळ घालवू नका. लवकरात लवकर मदत घ्या कारण हा आजार मदत न मिळाल्याने वाढतो आणि त्या व्यक्तीला मदत करणे तेवढेच कठीण होत जाते. 

हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण याच औषधे आणि समुपदेशन यांनी व्यवस्थापन नक्कीच होतं.

जमेल तितक्या लवकर उपाय हा योग्यच!


Comments

Popular posts from this blog

१८००चा हिशोब , जगण्याची धडपड, अनभिज्ञता आणि आपण !