कधी शिकणार ?
अपंगत्व आणि आपण
३ डिसेंबर - इंटरनॅशनल डे ऑफ पीपल विथ डिसेबिलिटी वरची पोस्ट इन्स्टा आणि एफबी वर टाकली, वाटलं चला काम झालं, पण मनात खूप सगळे प्रश्न अजूनही होते आणि दुर्र्दैवांन राहतील.असं असू शकतं का कि ज्या cause साठी आपण काम करायचंय असं म्हणून हट्टाने काम करतोय पण ते खरच साध्य होतंय का? खऱ्या अर्थाने लोकं सजग होत आहेत का? आज मी अपंगत्व आणि सर्वसमावेशकता यावर लिहिलंय पण माझ्या अनुभवाप्रमाणे ज्या मोठमोठ्या शाळा "आम्ही सर्वसमावेशक म्हणजेच इन्क्लुझिव्ह आहोत" अशा खरंच वेगळी, स्पेशल गरज असलेल्या मुलांना घेतात ? नाही!
आता स्पेशल म्हणजे काय ? कि ज्या मुलांना शारीरिक अपंगत्व आहे.
अगदी कुठल्याही शाळेत त्यांना ऍडमिशन मिळू शकतं हे त्या खुद्द पालकांना हि माहित नसतं, शाळेत अशा मुलांसाठी काय गरज आहे, काय असायला हवंय? असं म्हणून फक्त काउन्सेलर आणि एकटा प्रिन्सिपल सेन्सिटिव्ह असून चालत नाही, संपूर्ण मॅनेजमेंट टीम यासाठी संवेदनशील व प्रसंगी कृतिशील लागते. पण त्यांना याच काहीच पडलेलं नसतं आणि यासाठी काही अज्ञानी आणि घाणेरडया मनोवृत्ती जवाबदार असतात त्या म्हणजे,
- शेवटी काय करणार आहेत हे शिकून?,मेणबत्त्या आणि ग्रीटिंग्सचं बनवणार ना?
- आणि याना शिकवायला वेगळे शिक्षक लागतात ते कुठून आणणार?, किंवा तुम्हीच शिकवा,
- इथे नॉर्मल मुलांनाच बेसिक सुविधा नाहीत तूम्ही यांचं काय घेऊन बसलात?,
- हा त्यांच्या पालकांचा प्रश्न आहे आपला नाही.
आता हे होतं, 'शारिरीक अपंगत्व' बद्दल, ज्याला खरंच समाजाकडून एक सहानुभूती तरी मिळते, पण मानसिक अपंगत्व, जे असही पटकन नजरेला दिसत नाही आणि त्याबद्दल काय मिळतं आणि आपण काय देतो हे सर्वांनाच माहित आहे. साधं तुमच्या समोर एखादं मतिमंद मूल आलं तर तुम्ही काय करता?, आपल्या लहान मुलांना त्या मुलाबद्दल काय सांगता? स्वतः त्यांच्या पालकांना नॉनव्हर्बली काय सांगता? मूल सोडा एखादी व्यक्ती जी बटू (Dwaf) असेल तर आपण काय करतो? हे काय मी सांगायला नकोय, तुम्हाला चांगलंच माहित आहे. मी चक्क हसणारे आणि मस्करी करणारे पहिलेत,अगदी महिला पुरुष सगळेच. एखादी आत्महत्या आणि तिचं राजकारण व्हायला लागणारा शष्प वेळ हि सुद्धा याचीच उदाहरणे आहेत.
मग डिप्रेशन क्यो? आत्महत्या का? असे अविवेकी विचार आणि कृती का? अशी निव्वळ फालतू स्टेटमेंट्स करायलाही मागे पुढे पाहत नाही, जसं शारीरिक अपंगत्व किंवा आजार आपण निवडत नाही तसच 'डिप्रेशन' हे काय कुणी स्वेच्छेने, आनंदाने निवडत नाही, घेऊन बसत नाही, गुरफटत नाही, तो आजार आहे बस्स आणि तो ही न्यूरॉलॉजिकल! हे आपण कधी शिकणार ? कधी शिकणार कि आत्महत्याचे विचार येणं हि मेडिकल इमर्जन्सी आहे. तिथे तुम्ही वाट नाही 'च' बघू शकत! गरज असते ती आपल्या असलेल्या आजुबाजुंच्या लोकांची या बाबत सजग असण्याची! अशी व्यक्ती मदतीकडे येत नाही तर ती आणावी लागते तिच्या कुटुंबाकडून! हे शिक्षण कोण देणार ? फक्त शिक्षण व्यवस्थाच का? जस आपण मुलां, मुलींना काही गोष्टी शिकवतो ना? स्वतः ला हे माहित हवंय असं म्हणूनही शिकतोच ना? सगळ्यांचीच सगळ्या गोष्टी शिकण्याबाबतीत एक प्रकारची उदासीनता का असावी? हे मला पडलेलं कोडं आहे. नको असतात चार चांगल्या गोष्टी, आम्हाला मिम्स आवडतात, दळभद्री व्हिडीओज आवडतात, पण काही नव्याने शिकायचं म्हटलं तर ते नकोच असत, जोपर्यंत स्वतःच्या जीवावर येत नाही तोपर्यँत!
एकवेळ मदत न करता येणं, हे मी समजू शकते पण समोरच्याला, स्वतःला मदतीची गरज आहे, किंवा लागू शकते हे एक्सटेंप्ट च न करणं हे सर्वात घातक. म्हणजे गरज आहे असं दिसतंय, कळतंय तरी योग्य मदत करायची नाही आणि पालक /नातेवाईक म्हणून एकमेव काम करायचं ते म्हणजे ठेवायच्या त्या भल्या मोठ्या आशा आणि अपेक्षा!
- तुला येणारा एकसारखा संशय हि चांगली गोष्ट नाहीय,
- तुझं दारूचं असलेलं व्यसन हे कुठेतरी थांबायला हवय,
- सारखा येणारा राग हा तुझ्यासाठी सगळ्या दृष्टीने वाईट आहे,
- जास्त हळवं असणं चूक नाहीय पण त्याचा तुला त्रास होतोय हे कळणं महत्त्वाचं आहे,- तुमच्या पाल्याला लिहायला येत नाही, चुका होत आहेत त्याला किंवा तिला लर्निंग डिसेबिलिटी असू शकते,
- तुमच्या पाल्याच्या वर्तनासाठी त्याला आणि तुम्हाला सुद्धा पालक म्हणून काउन्सेलिंग ची गरज आहे
अशा किती गोष्टी आपण स्वतः स्वीकारतो?, त्यासाठी मदत करतो ? हे मी माझ्या कामात अनुभवले आहे, त्यातून बरच शिकले आहे. जे करत आहेत त्यांना एकच सांगणे आहे, सर्वात उत्तम सेव्हिंग म्हणजे आपण आणि आपल्या जवळच्यांच जपलेलं 'मानसिक आरोग्य'. मित्र बनायचंय असेल तेव्हा मित्रच बना आणि, पालक व्हायचं असेल तेव्हा सुजाण पालकच!
अशा भरपूर गोष्टी शिकण्याची आज गरज आहे आणि गरज आहे स्वतःला आणि सर्वाना खऱ्या अर्थाने स्वीकारण्याची!
अशा भरपूर गोष्टी शिकण्याची आज गरज आहे आणि गरज आहे स्वतःला आणि सर्वाना खऱ्या अर्थाने स्वीकारण्याची!
Comments
Post a Comment